अकोले : अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्या आहेत.संगमनेरच्या पठार भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारा अकोल्यातील पिंपळगावखांड तलावाचा पाणीप्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. संगमनेर तालुक्यातील ११ गावांच्या पाणीयोजना या तलावातून राबविण्यास मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी या प्रश्नात अकोल्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तर अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही नवीन पाणी निर्मितीनंतरच नळ योजनेचे पाइप तलावात टाकले जाईल, अशी ग्वाही दिली होती.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यातील जलसंपदाची कामे आणि संगमनेरच्या साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार लहामटे, आमदार खताळ, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी या दोन्ही आमदारांनी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत ज्या योजना, प्रकल्पाची कामे सुचवली आहेत, त्या योजना व कामांचा जलसंपदा विभागाने अभ्यास करावा. ज्या योजनाच्या कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. तसेच अकोले व संगमनेरमधील सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता, प्रत्यक्ष होत असलेलला पाणीसाठा याबाबतही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या.या बैठकीत आमदार डॉ. लहामटे आणि आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांनी कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीत मेळावणे बंधारा, बिताका पाणी वळण बंधारा, भंडारदरा धरण, घोटी शिळवंडी, बलठण, पाडोशी तलावात बुडित बंधारे बांधणे, निमगाव भोजापूर धरण पाण्याचे नियोजन, साकुर पठार भागातील पाणी प्रश्न आणि निळवंडे डावा व उजवा कालवा आदींचा आढावा घेण्यात आला.