सोलापूर : केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ डाव्या लोकशाहीवादी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या ‘औद्योगिक बंद’ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या पूर्व भागातील यंत्रमाग, विडी, गारमेंट आदी उद्योगांना या बंदचा फटका बसला. हा अपवाद वगळता अन्य उद्योग व्यवसाय नियमितपणे सुरू होते.

शहरात विविध १७ विडी कारखान्यांमध्ये मिळून सुमारे ७० हजार महिला विडी कामगार आहेत. तर यंत्रमाग उद्योगात सुमारे ४० हजार कामगार आहेत, तसेच गारमेंट उद्योगाशी संबंधित शिलाई कामगारांची संख्या ३० हजारांच्या घरात आहे. या तिन्ही प्रमुख उद्योगांतील बहुसंख्य कामगारांनी औद्योगिक बंदमध्ये सहभाग घेतला होता. माकप, सिटू आदी डाव्या लोकशाहीवादी संघटनांचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात पुकारलेला औद्योगिक बंदला शआभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा सिटूचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केला.

हेही वाचा – अजित पवार का म्हणाले, “…तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल”

दुपारी दत्तनगर लाल बावटा कार्यालयापासून कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. गेली आठ वर्षे निष्क्रिय राहिलेल्या विडी कामगार कल्याणकारी मंडळाचा गरजू विडी कामगारांना लाभ मिळत नसल्याबद्दल आडम मास्तर यांनी संताप व्यक्त करीत हे कल्याणकारी मंडळाचे पुनरूज्जीवन करण्याची मागणी केली. विडी, यंत्रमाग व गारमेंट कामगारांना किमान वेतनासह महागाई भत्ता मिळावा, यंत्रमाग कामगारांची सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, फरकासह किमान वेतन मिळावे आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेक-यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून सादर केले.

हेही वाचा – “त्यांनी हातवारे करून उचकवलं अन्…”, भास्कर जाधवांनी सांगितला गुहागरमधील राड्याचा संपूर्ण घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आडम मास्तर व एम. एच. शेख यांच्यासह नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख, व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी, ॲड. अनिल वासम, सुनंदा बल्ला, रंगप्पा रेड्डी, शशिकांत ठोकळे, मुरलीधर सुंचू आदींची भाषणे झाली.