अहिल्यानगर : भावनोद्दीपणातून नवनिर्मिती फक्त माणूसच करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यामध्ये ही क्षमता नाही. त्यामुळे मानवाची उत्स्फूर्तता हीच सर्जनशीलतेची खरी ताकद आहे. एआयला मन नाही. त्यामुळे फक्त आहे ते त्याच्या पद्धतीने जोडून त्याचे अर्थ तो काढतो.

मात्र, मानवी मनाप्रमाणे सर्जनशील पद्धतीने अनेकदा नेमका अर्थ काही एआय काढू शकत नाही. त्यासाठी मानवी मन लागते, असे मत ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या संवाद सत्रात ते बोलत होते. दया पवार साहित्यनगरीत आयोजित या कार्यक्रमात सावंत यांच्यासह साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ तर, अध्यक्षस्थानी आमदार सत्यजित तांबे व प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले, एआय हा निर्मितीक्षम तर माणूस नवनिर्मितीक्षम आहे. औद्योगिक क्रांतीने वर्किंग क्लासला तर एआय क्रांतीने अनवर्किंग क्लास निर्माण करेल, असे युवान नोवाल हरारी म्हणतो. शिस्त आणि आज्ञापालन हे सैन्यातून नंतर कंपनी कामगार यात आणि नंतर समाजात आले असे काही विचारवंत सांगतात. यातून समाजाची एकूण विचारक्षमता खुंटीत होते. असा समाज तयार होणे ही खरी समस्या आहे. त्यामुळे अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षित पद्धतीने उत्तरे देणे किंवा सामोरे जाणे हेच आपण विसरलो आहोत.

विनोद शिरसाठ म्हणाले, लेखकांनी खुला दृष्टिकोन ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. बदलती भाषा आणि मूल्यव्यवस्था लक्षात घेता यात नियमितपणे बदल होत असतो. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. मराठी भाषेचे काय होणार, हा मोठा प्रश्न वाचक व भाषिकांचा नाही.

लेखकांना याबद्दल साशंकता वाटते. उलट इतिहासात कधी नव्हती इतकी मोठी संधी आता मराठी भाषेला असल्याचे मला वाटते. अनुवादामुळे ही अनुकूलता हजारो पट वाढली आहे. स्वनियंत्रण व दर्जाचा आग्रह पूर्ण करून वाचकाभिमुख विचारांनी नियतकालिके सुरू झाल्यास वाचक नक्कीच मिळतील. एआयची माहिती कमी आणि भीतीदायक बोलबाला जास्त असे चित्र आहे.