गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रमोद शेकोकर यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोली झाडून घेत जीवन संपवले आहे. शेकोकर यांनी आत्महत्या का केली, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सविस्तर वृत्त असे की, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे सुरक्षारक्षक प्रमोद शेकोकर यांनी रविवारी २० फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रमोद शेकोकर हा पोलीस शिपाई अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलॉनीमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्ये राहायचा.
रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडली. गोळी झाडल्याच्या आवाजामुळे परिसरात आवाज आला. या आवाजामुळे परिसरातील व्यक्तींनी गर्दी केली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्यासह पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाची पत्नी सुध्दा पोलीस विभागात कार्यरत असून ती ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे. दरम्यान, प्रमोद शेकोकर यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.