अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता दोन गट पडले आहेत. पक्षातील बहुतांश आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, काही आमदार शरद पवार यांच्या गटात आहेत. तर काही आमदारांनी अनेकदा भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनीदेखील आतापर्यंत तीन वेळा त्यांची भूमिका बदलली आहे. आमदार किरण लहामटे हे २ जुलै रोजी अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांची भूमिका बदलली.

शपथविधीनंतर किरण लहामटे यांनी सांगितलं होतं की ते सध्यातरी तटस्थ आहेत. त्यानंतर ते म्हणाले, मी मतदार संघात जाऊन, लोकांशी बोलून याबाबतचा निर्णय घेईन. दोन दिवसांनी किरण लहामटे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांची भूमिका बदलून आपण अजित पवार यांच्याबरोबर असल्याचं जाहीर केलं आहे.

मतदारसंघातील विकासासाठी आपण अजित पवारांबरोबर असल्याचं आमदार किरण लहामटे यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात किरण लहामटे म्हणाले, मी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी लोकांमध्ये गेलो. मतदारसंघातील लोकांशी चर्चा केली. याचदरम्यान, अजित पवार यांनी मला न्यायला माणसं पाठवली होती. दोन-तीन दिवस ही सगळी माणसं माझा पाठलाग करत होती. त्यानंतर ही माणसं मला भेटली, त्यांनी माझा अजितदादांशी संपर्क घडवून आणला. या काळात अजित पवार यांनी माझ्या पत्नीलाही दोन-तीन वेळा फोन केला. त्यांचं म्हणणं होतं, मी आमदार साहेबांना काही डांबून ठेवणार नाही. म्हणजेच मला काही ते डांबून ठेवणार नाहीत. ते म्हणाले, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही फक्त या आणि १५ ते २० मिनिट चर्चा करा. त्यानंतर तुमचा निर्णय तुम्ही घ्या.

आमदार किरण लहामटे म्हणाले, अजित पवारांशी बोलणं झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. देवगिरी बंगल्यावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते मला म्हणाले, आमदारसाहेब तुम्हाला २०१९ ला तिकीट मी दिलं. तुम्हाला निधी मी दिला. मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयाचा, एमआयडीसीचा प्रश्न मिटवायला मदत केली. तुमच्या मेळावणे येथे बंधारा बांधायचा आहे. हे सगळं कोण करू शकणार आहे? मी सोडून कोण तुम्हाला साथ देणार आहे? त्यानंतर अजित पवार यांनी वन विभागाशी संपर्क केला. आमच्याकडे अभयारण्य आहे, तिथले काही प्रश्न आहेत. तिथे बोगदा करायचा आहे, देवीच्या घाटाचा रस्ता करायचा आहे. अजित पवार मला म्हणाले, केंद्रातून तुम्हाला या सगळ्यासाठी मदत झाली तर हे प्रश्न सुटू शकतात.

हे ही वाचा >> राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण लहामटे एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अजित पवारांचं हे सगळं बोलणं ऐकूण मला जाणीव झाली की केंद्रात आणि राज्याची सत्ता असली तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात. अजित पवारांच्या बंगल्यावरून निघाल्यावर येता-येता मी लोकांशी चर्चा केली. जे लोक मला शरद पवारांबरोबर जायला सांगत होते त्यांच्याशीही मी बोललो. त्यातले बरेच जण मला म्हणाले, मतदारसंघात विकास झाला पाहिजे, त्यासाठी निधी आला पाहिजे. निधी मिळत असेल, पुढच्या वेळी उमेदवारी निश्चित असेल तर अजित पवार यांच्याबरोबर गेलं पाहिजे. मग मी अजित पवार यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला.