अकोले: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या गाडीला आज, मंगळवारी विठे घाटात अपघात झाला. या अपघातातून आमदार लहामटे बचावले असून, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.आमदार लहामटे यांचे तालुक्यातील राजुर येथे निवासस्थान आहे. आज दुपारी अकोले येथून ते राजुरला चालले होते.

अकोलेपासून सुमारे १० किमी अंतरावरील विठे घाटात त्यांच्या गाडीला समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या मालमोटारीने जोराची धडक दिली. या अपघातात डॉ. लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी त्यांच्यासह गाडीमधील सर्वजण बचावले. कोणालाही इजा झाली नाही.

अपघाताची माहिती समजताच तालुक्यात खळबळ उडाली. चौकशीसाठी आमदारांचा फोन खणखणू लागला. अनेक कार्यकर्त्यांनी राजुर येथे धाव घेतली. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार लहामटे यांनी समाजमाध्यमातून आपल्या अपघाताची स्वतः माहिती दिली. विठे घाटात माझ्या गाडीला अपघात झाला. कोणतीही दुखापत झालेली नाही. आपण पूर्णपणे सुखरूप असुन राजुर निवासस्थानी आहोत. त्यामुळे कार्यकर्ते, हितचिंतक यांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.