तिन्ही विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधीचा विश्वास
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला कौल दिला असला तरी सत्तेवरून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेल्या तणावामुळे मंत्रीपदासाठी उत्सुक असलेले जिल्ह्यातील आमदार अस्वस्थ झाले आहेत. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यात भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक अशी तीन मंत्रिपदे होती. यावेळीही हे तिन्ही विद्यमान मंत्री पुन्हा संधी मिळेल या विश्वासाने संबंधित सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
विदर्भात बहुतांश ठिकाणी भाजपची पडझड झाली आहे. पण यवतमाळ जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे वर्चस्व कायम ठेवले. राळेगावचे डॉ. अशोक उईके हे विद्यमान आदिवासी विकास मंत्री तर यवतमाळचे मदन येरावार आणि दिग्रसचे संजय राठोड हे राज्यमंत्री आहेत. हे तिघेही पुन्हा निवडून आल्याने त्यांनी मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. विशेष म्हणजे, येरावार आणि संजय राठोड यांना आता बढतीचे वेध लागले असून कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डॉ. अशोक उईके आपले मंत्रीपद आणि खाते दोन्ही कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत.
राजकीय विश्लेषकांचे अंदाज मात्र वेगळेच आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान विधान परिषद सदस्य व नुकतेच परांडातून निवडून आलेले तानाजी सावंत यांचे नाव चर्चेत आल्याने खासदार गोटात आनंद तर स्थानिक वर्तुळात अस्वस्थता आहे. तीन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या जिल्ह्यातील अन्य एका आमदारास मंत्रिमंडळात कायम राहणार, असा विश्वास असला तरी, खातेबदलाची भीतीही आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काटय़ाची टक्कर देऊन ‘बंगल्या’स हादरे देणारे भाजपचे उमदेवार तथा विधान परिषद सदस्यसुद्धा आपल्याला लॉटरी लागेल या आशेवर असल्याचे सांगण्यात येते.