कराड: वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील घरकुल अपात्र प्रकरण गंभीर असून, याप्रकरणी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता ठेवून सर्वसामान्यांना न्याय, द्यावा. वरिष्ठांनी योग्य ती कारवाई केली नाही, तर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण मांडणार असल्याचा इशारा आमदार मनोज घोरपडे यांनी दिला.

वडोली निळेश्वर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्यावरील कारवाईसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन आमदार घोरपडे यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले.

ग्रामसेविका कोळींच्या मनमानी कारभाराविरोधात गावातील तरुणांनी शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन केले. गावातील बोगस ग्रामसभेच्या ठरावाने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांची घरकुले पात्र करून मंजुरी मिळावी किंवा ग्रामसेविका कोळींकडून घरकुलांची रक्कम वसूल करून द्यावी, ग्रामसेविकेवर कठोर कारवाईसह ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. या वेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्याच्या सूचना आमदार घोरपडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार लगेचच ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्यात आले.

कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले, ‘शासकीय कामात अनियमितता आढळल्याने यापूर्वीच ग्रामसेविका कोळींची वेतनवाढ रोखली आहे. आठ- दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कार्यवाही केली जाईल. आज ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेले दप्तर सील करून त्याची सखोल तपासणी केली जाईल. काही कागदपत्रे गहाळ असल्यास, तीही कारवाई केली जाईल.’

दरम्यान, आमदार मनोज घोरपडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अपात्र घरकुल प्रकरण कशाप्रकारे हाताळता येईल व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, ‘ग्रामसेवकाचे कामकाज हे थेट शासनाच्या मूल्यमापनावर परिणाम करत असते. त्यामुळे वडोली निळेश्वरच्या ग्रामसेवकांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. तसेच राजकीय दबावाला बळी पडू नये. कामात चुकीचे काही जाणवल्यास कडक कारवाई करण्यात येईल.’