गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या प्रकारावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले आमदार राजेश क्षीरसागर हे हजारो कार्यकर्त्यांसह गुरुवारी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला असून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युतीचे प्रमुख पदाधिकारी उपोषण करणार आहेत.

आज निघालेल्या मोर्चामुळे शहरातील मुख्य मार्गावरील व्यवहार बंद झाले होते. तर आमदार क्षीरसागर यांच्यावरील विनयभंगाच्या कलमावरून पोलीस अधिका-यांची भूमिका व युतीचे लोकप्रतिनिधी यांच्यात टोकाचे अंतर दिसून आले. पोलिसांनी आपली भूमिका बदलल्याबद्दल युतीतून दिशाभूल केल्याचाआरोप करण्यात आला.     
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस कर्मचा-यांवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्यावरून आमदार क्षीरसागर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी गुरुवारी मोर्चाने पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय क्षीरसागर यांनी घेतला होता. त्यानुसार आज शिवसेनेच्या शहर कार्यालयात आमदार क्षीरसागर सकाळीच हजर झाले होते. तेथे आमदार नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर आदी प्रमुख उपस्थित होते.     
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी आमदार नीलम गोऱ्हे यांच्याशी क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्य़ाबाबत चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गोऱ्हे म्हणाल्या, आमदार क्षीरसागर यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत विठ्ठल पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी अज्ञात व्यक्ती व समूहावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले आहे. आमदार क्षीरसागर यांच्यावर वैयक्तिक दोषारोप नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. तथापि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही बाब स्पष्टपणे समोर येणार आहे. पोलिसांना दिसलेल्या वस्तुस्थिती आधारे गुन्हा दाखल केला असला तरी न्यायालय दाखल होणा-या कलमानुसार योग्य ती कारवाई करेल. तेथे जामीन मिळावा, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करीत आहोत.    
यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना शहर कार्यालयासमोर जमलेल्या शिवसैनिकांना हायसे वाटले. हा शिवसेनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया तेथे उमटली. गणपती बाप्पाने पोलिसांना सुबुध्दी दिली अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत राहिली.     शहर कार्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार राजन साळवी यांच्यासह जिल्ह्य़ातील युतीचे चार आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, भाजपाचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. महापालिका, शिवाजी चौक, भवानी मंडपमार्गे भव्य मोर्चा जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर पोहोचला. तेथे आमदार क्षीरसागर कार्यकर्त्यांसमवेत पोलिसात हजर झाले. पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांतून शिवसेना जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा सुरू होत्या.    
पोलीस ठाण्यामध्ये तासभर कायदेशीर प्रक्रिया सुरू राहिली. तेथे आमदार क्षीरसागर यांना अटक करण्यात आली. तेथूनच त्यांना पोलीस व्हॅनमधून कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने आमदार क्षीरसागर यांनी स्वतच युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आमदार क्षीरसागर यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर आमदार क्षीरसागर व त्यांच्या समवेत असणा-या कार्यकर्त्यांत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला असून अंतिम विजय कायदेशीर मार्गाने होईल, असे पत्रकाव्दारे जाहीर करण्यात आले.
कोल्हापूर ठप्प
आमदार क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठीमोठी गर्दी झाली होती. युतीच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी महासंघ, टोलविरोधी कृती समिती, तालीम संस्था, नगरसेवक, नागरिक यांचाही मोर्चामध्ये समावेश होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापा-यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरील व्यवहार आज पूर्णत: बंद होते. भव्य मोर्चा व बंद यामुळे दुपारपर्यंत शहरातील व्यवहार कोलमडले होते.
पोलीस प्रशासनाशी लढा
विनयभंगाच्या गुन्ह्य़ामध्ये आमदार क्षीरसागर यांचा समावेश नसल्याचे पोलीस उपअधीक्षकांनी पत्राव्दारे आम्हाला कळविले आहे, असा उल्लेख करून आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, तरीही आमदार क्षीरसागर यांच्याबाबतीत विनयभंगाचे विधान करून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले. असे विधान करणा-या अधिका-याची क्लिपिंग पाहून त्यांच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाणार आहे. अॉट्रॉसिटी कायद्याप्रमाणे विनयभंगाच्या कलमाचा गैरवापर होत चालला आहे. आत्तापर्यंत युतीचे कार्यकर्ते शांत होते. पण आता राजकीय दबावाखाली वागणा-या प्रशासनाविरुध्द म्यान केलेली तलवार बाहेर काढली आहे.