सांगली : वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना धमकावणे घडले असेल तर ते चुकीचे आहे. मात्र याबाबत दोन्ही बाजू वेगवेगळ्या पध्दतीने समोर येत आहेत. याबाबतची नेमकी वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर भाष्य करणे योग्य ठरेल. तथापि, जर चुकीचे काही होत असेल तर त्यावर कारवाई करणे हे प्रशासनाचे कामच आहे. त्यानुसार कारवाई होत असताना राजकीय हस्तक्षेप होणे चुकीचे आहे असे आमदार रोहित पाटील येथे बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात एका महिला अधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीबाबत विचारले असता ते बोलत होते.
राज्य शासनाने जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मांडले असून या विधेयकाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज महात्मा गांधी पुतळा येथे निषेध आंदोलन केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर आदींसह घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या वेळी पाटील म्हणाले, की जनसुरक्षा विधेयक लोकशाहीवर घाला आहे. या विधेयकामुळे सामान्य माणसाच्या हक्काची कशी गळचेपी होणार आहे हे सांगण्यासाठी जनचळवळ उभारणार आहे. जनसुरक्षा विधेयकांच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेच्या लोकशाही हक्काची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे.
या विधेयकामुळे होणारे फायदे-तोटे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनचळवळ उभी करणार असून गावागावापर्यंत जाऊन या विधेयकाबाबत माहिती देऊन लोकजागृती करणार आहोत. या विधेयकामुळे प्रगतिपथावर असलेला महाराष्ट्र पुन्हा अधोगतीकडे जाण्याचा धोका आहे. राज्याचे नुकसान करणारे हे विधेयक असून याच्याविरोधात जनचळवळ उभी करण्यात येईल असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला अधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत दोन्ही बाजू वेगवेगळ्या पध्दतीने समोर येत आहेत. याबाबतची नेमकी वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर भाष्य करणे योग्य ठरेल. तथापि, जर चुकीचे काही होत असेल तर त्यावर कारवाई करणे हे प्रशासनाचे कामच आहे. त्यानुसार कारवाई होत असताना राजकीय हस्तक्षेप होणे चुकीचे आहे असे आमदार पाटील म्हणाले.
जनसुरक्षा विधेयकाला विरोध असल्याचे निवेदन महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत देवराज पाटील, माजी आमदार विक्रम सावंत, शंभूराज काटकर आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मांडले असून या विधेयकाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज महात्मा गांधी पुतळा येथे निषेध आंदोलन केले.