करोनाच्या प्रसाराबरोबरच करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना शोधण्यासाठी सर्व राज्य सरकारं युद्ध पातळीवर काम करत आहे. केंद्रापासून जिल्ह्यापर्यंतच्या आरोग्य यंत्रंणा याकामात गुंतली असताना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या माध्यमातून चाचण्या न करण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं मंगळवारी सर्व राज्यांना दिले. चीनमधून आलेल्या या किट्स सदोष असल्याच्या तक्रारी राज्यांनी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला एक सूचना केली आहे.

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीचे रिझल्ट दाखवत असल्याचं अनेक राज्यांमध्ये दिसून आलं. यासंदर्भात राज्यस्थानसह काही राज्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएसआर) तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर करोनाग्रस्तांच्या चाचण्या करण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट्सचा वापर दोन दिवसांसाठी थांबवावा, असे निर्देश आयसीएसारनं राज्यांना दिले. याच विषयावरून आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला एक सूचना केली आहे. “केंद्राने ६०० रुपये दराने चीनकडून घेतलेल्या टेस्टिंग किट्सनं चुकीचा निष्कर्ष येत असल्याने राजस्थान सरकारने त्याचा वापर थांबवल्याची बातमी आहे. तर छत्तीसगडने द. कोरियाकडून निम्म्या दरात घेतलेल्या किट्सचा निष्कर्ष योग्य आहे. त्यामुळे केंद्राने चीनला दिलेल्या २० लाख किट्सच्या ऑर्डरचा फेरविचार करावा,” असं रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

आणखी वाचा- चीनच्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे रिपोर्ट; राजस्थान सरकारनं तात्काळ वापर थांबवला

राज्यस्थानमध्ये काय झालं?

राजस्थान सरकारनं मंगळवारी चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. “चीनमधून आणण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किट्सनं ९० टक्के अचूक निकाल देणं अपेक्षित आहे. पण, या किट्स फक्त ५.४ टक्केच अचूक निकाल देत आहेत. त्यामुळे या किट्सचा वापर करण्याचा काहीही उपयोग नाही. या किट्सबद्दल आयसीएमआरला (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) माहिती देण्यात आली आहे,” अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली होती. राजस्थानसह इतरही राज्यांकडून आयसीएसआरकडे यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत.