मुंबईतील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात एकीकडे शपथविधी सोहळा संपन्न झाल्याची चर्चा रंगत असताना मुंबईतील निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामविरोधात मनसे कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. मुंबईत ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यांसोबत सेल्फी काढून पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. शिवसेनेने काही करुन दाखवण्याच्या आश्वासन देवून मुंबईला खड्यात घातल्याचा सूर कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. खड्यात फसलेल्या मुंबईला सुस्थितीत आणण्यासाठी मनसेने यावेळी मुंबई पालिका आयुक्तांना निवेदन सादर केले असून रस्त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास तीव्र अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनादरम्यान कांदिवलीमधील समतानगर परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमकपणाचा कळस करत रस्ते कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मनसेच्या या कृत्यामुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी रस्तेबांधकामातील भ्रष्टाचाराचा मुद्दा मनसेने वेळोवेळी पालिकेत मांडला आहे. मनसेच्या या आंदोलनाला महापालिका प्रशासन किती गंभीर घेईल, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.