नागपूरपासून ४२ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील मनसर येथील राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तोडफोड केली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले. यात नाक्याचे २.५० लाखाचे नुकसान झाले.
राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण सुरू असून मनसर येथे टोल नाका आहे. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास स्कार्पिओ कारमधून, तसेच पायी दहा-पंधरा जण नाक्यावर आले. त्यांनी नाक्यावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर काही जण नाक्यात शिरले. काठय़ांनी टोल नाक्यावर तोडफोड केल्याचे पाहून नाक्यावरील कर्मचारी पळून गेले. काही मिनिटांत तोडफोड करणारेही पसार झाले. काही वेळाने कर्मचारी तेथे परतले. या कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षक, तसेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली़  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन  पोलिसात तक्रार दाखल केली़  प्राथमिक पोलीस चौकशीनंतर तोडफोड करणारे मनसेचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी शासकीय संपत्तीची हानी, तसेच इतर गुन्हे दाखल केले. घटनेआधी या कार्यकर्त्यांसोबत नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वाद झाला होता, अशीही पोलिसांची माहिती आहे.