Raj Thackeray PC Latest Updates: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या पॅनेलने ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव केला. या निवडणुकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात होते. या पराभवानंतर आज अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर आता राज ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.

काही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असे राज ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी ॲस्थेटिक या विषयाबाबत आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती. शहर नियोजन हा माझा आवडीचा विषय आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात आता पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ज्याठिकाणी ५० माणसे राहत होती, आता तिथे ५०० माणसे आली आहेत. त्यांच्या गाड्या वाढल्या. कचरा वाढला. हे सर्व आता रस्त्यावर येत असून त्यामुळे शहराचा बट्ट्याबोळ होत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आपण कबूतर, हत्ती यासांरख्या विषयात अडकलो आहोत. त्यात या महत्त्वाच्या विषयांवर आपले दुर्लक्ष होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. पार्किंगच्या समस्येकडे आपण डोळसपणे पाहत नाही आहोत. याच संदर्भात आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना आराखडा दिला.”

वाहतूक कोंडी हा सर्वात गंभीर प्रश्न

खेळाच्या मैदानाखाली पार्किंग तयार करता येईल. यामुळे मैदानेही तशीच राहतील, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच पार्किंग आणि नो-पार्किंग कुठे आहे, हे ओळखता यावे, यासाठी रस्ते आणि पदपथावर विशिष्ट रंग लावण्यात यावा. तसेच दंडाची रक्कम वाढवावी, असे राज ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले. मद्य पिऊन वाहन चालविल्याबद्दल दंडाची रक्कम वाढविल्यानंतर त्याबाबत जनजागृती वाढली आहे. त्यामुळे पार्किंगबाबतही तशीच तरतूद करावी, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले…

वाहतूक कोंडी आणि मुंबईत पुर्नविकासामुळे वाढत चाललेली वाहन संख्या हा मुख्य प्रश्न सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. दोन दिवस मुंबईत झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उडालेली दैना. पाणी साचणे, रस्त्यावरील खड्डे असे अनेक प्रश्न आहेत. पण आज केवळ वाहतुकीबाबत चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द दिल्याचे राज ठाकरे म्हणाले.