मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यात मनसेच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी राज्यातल्या ग्रामीण भागातील परिस्थितीचा उल्लेख करत मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना, तसेच ग्रामपंचायत सदस्, सरपंचांना गावात स्वच्छता ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचाही उल्लेख करत मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, आध्यात्मिक गुरूंना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. त्यावर राज ठाकरेंनी आज पुण्यात केलेल्या भाषणाच्या शेवटी कार्यकर्त्यांना उद्देशून सूचना केल्या.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, वाद व आरोप-प्रत्यारोपांमध्ये न पडण्याचं आवाहन मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांना केलं आहे. “२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. मला तिथे राम मंदिर होण्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले, त्यांचं स्वप्न २२ तारखेला पूर्ण होतंय”, असं राज ठाकरे म्हणाले.
“त्या कारसेवकांसाठी जिथे कुठे आरती, पूजा-अर्चा कराव्याशा वाटतील, त्या सर्व सामान्य लोकांना त्रास न देता मनसेच्या कार्यकर्त्यांनी करायला हव्यात असं मला वाटतं”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी देशातील सर्व नागरिकांना आपापल्या घरात ‘श्री राम ज्योती’ लावण्याचं आवाहन केलं आहे.