Raj Thackeray on Chhava movie trailer: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या आगामी बॉलीवूड चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली आहे. तर संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात दोघेही लेझिम हे लोकनृत्य सादर करताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या दृश्यावर टीका केली होती. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी काही राजकारण्यांशी संवाद साधला होता. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. याबाबत आता खुद्द राज ठाकरे यांनीच भूमिका स्पष्ट केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राज ठाकरे यांनी निकालापासून विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी छावा चित्रपटाबाबत भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे म्हणाले, “लक्ष्मण उतेकर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहीजे, मी काही या चित्रपटाचा वितरक नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनाची माहिती देणारा चित्रपट पाहिलाच पाहीजे.” लक्ष्मण उतेकरांच्या भेटीबद्दल बोलताना म्हणाले की, त्यांनी मला सांगितले की, संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले आहे. अर्थात लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. कदाचित इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी कधी त्यांनी लेझीम खेळली असेल. पण मी त्यांना म्हटले की, या दृश्यावरून चित्रपट पुढे सरकतोय की फक्त सेलिब्रेशन पुरते गाणे आहे. ते म्हणाले फक्त सेलिब्रेशन पुरते आहे. मग एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावत आहात? अशी सूचना त्यांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “प्रेक्षक जेव्हा औरंगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून चित्रपट पाहायला जातील, तेव्हा महाराज लेझीम वैगरे खेळताना दिसतील. त्यापेक्षा ते काढून टाका. रिचर्ड एटनबरोने जेव्हा महात्मा गांधींवर चित्रपट केला, तेव्हा महात्मा गांधींनी केलेली आंदोलने आपल्या डोळ्यासमोर होती. कदाचित महात्मा गांधींनी चित्रपटात दांडीया खेळताना दाखविले असते तर.. कदाचित दिग्दर्शकांना तसे दाखवायचेही असेल पण त्यांनी दाखविले नाही.”