scorecardresearch

Raj Thackeray MNS Padwa Melava: “मी एकदा उद्धवला म्हणालो की चल…”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “बाळासाहेबांना मी सांगितलं..!”

MNS Gudi Padwa Rally Updates: राज ठाकरे म्हणतात, “तिथून आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला…!”

Raj Thackeray MNS Padwa Melava Mumbai
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्याच्या भाषणात काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींवर राज ठाकरे भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलं होतं. त्यामुळे या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असताना आपल्या भाषणात राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याआधीचा एक प्रसंग सांगितला. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंशी झालेल्या संभाषणाचा यावेळी राज ठाकरेंनी उल्लेख केला.

“मी आत्ताच सांगतो, उद्या कुणी काही बोलू नका”

हा प्रसंग सांगण्याआधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना इशाराही दिला. “त्यांच्या लोकांना आत्ताच सांगून ठेवतो की माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. कारण त्यानंतर माझ्या तोंडून काय बाहेर पडेल, ते झेपणार नाही तुम्हाला. सगळ्यांना महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याच्याआधी काय काय घडलं, या सांगणं गरजेचं आहे. आत्ताची परिस्थिती का ओढवली, हे त्यावरून समजेल”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“कुणाचातरी मुलगा म्हणून…”, आदित्य ठाकरेंवर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; म्हणाले, “अमित ठाकरे आजारी असताना…!”

“मी उद्धवला समोर बसवलं आणि…”

“मला बाजूला सारण्याचा प्रयत्न होत होता हे मला कळत होतं. मी एकदा उद्धवकडे गेलो आणि त्याला म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. मी त्याला समोर बसवलं. मी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय हे. मी त्याला विचारलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय हो. पण फक्त मला सांग माझं काम काय आहे?” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं?

राज ठाकरेंनी तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलेलं उत्तरही सांगितलं. “मी उद्धवला म्हणालो, मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नका. एरवी घरात ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही. पुढच्या वेळी प्रचाराला जायचं. काय तोंड दाखवू त्यांना. मला उद्धव म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग? नक्की ना? तो म्हणाला नक्की”, असं राज ठाकरंनी सांगितलं.

बाळासाहेबांशी झालेलं ‘ते’ संभाषण!

दरम्यान, ओबेरॉय हॉटेलमधील या भेटीनंतर मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला. “तिथून आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. म्हणाले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो. हे सगळं बोलणं झालं. सगळं मिटलं. त्यांनी मला मिठी मारली. मला म्हणाले उद्धवला बोलव. मी बोलावणं पाठवलं तर म्हणे येतायत. बाळासाहेब अधीर झाले होते. थोड्या वेळाने म्हणाले कुठे आहे उद्धव. मी परत बाहेर गेलो, तर मला तिकडे सांगितलं की ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालल्या होत्या की मी बाहेर कधी जातोय. त्रास देऊन ही माणसं बाहेर कशी टाकता येतील”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 20:51 IST

संबंधित बातम्या