“काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी त्यांना मी देशातील विमानसेवा बंद करण्याची विनंती केली आहे. आजपर्यंत ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता डॉक्टरांचं महत्त्व समजलं असेल. आज मंदिरं बंद आहेत, पण रूग्णालये सुरू आहेत, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काही जणांना अजूनही कळत नाही. कालचा बंद हा आपल्यासाठी होता. ती टेस्ट केस होती. जर लोकांनी ऐकलं नाही तर यापेक्षाही गंभीर पावलं सरकारला उचलावी लागतील. आज अनेक ठिकाणी वाहनं फिरताना दिसली. आज लोकं का बाहेर पडलीयेत हे माहित नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. “भारतात जर करोना पसरला तर पुढील कआळात ६० टक्के लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. एवढ्या प्रमाणात हा व्हायरस परसला तर आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे का? कालही संध्याकाळी लोकं थाळ्या वाजवायला घोळका करून बाहेर आली होती. मी हात धुवा असं सांगणार नाही. करोना आपल्यापाठी हात धुवून पडला आहे. मुठभर लोकांना समज येत नसेल तर सरकारनं आणि पोलिसांना कठोर निर्णय घ्यावा लागेल. ज्या गोष्टी आपण रोज पाळायला हव्या त्या पाळाव्याच लागतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- Coronavirus: राज ठाकरे म्हणतात “उद्धवा चांगलं तुझं सरकार”

“ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. हॉटेल बंद ठेवली पाहिजेत. पण त्यांची किचन सुरू राहू द्या. यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही. या यंत्रणा योग्यप्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. स्वच्छता ही आपण पाळली पाहिजे. सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता पाळली पाहिजे. काही ठिकाणी ती पाळलीही जाते. पण सर्व ठिकाणी पाळणं आवश्यक आहे. काल उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून त्यांना काही सुचनाही केल्या. सरकारी यंत्रणा जोमानं काम करतायत. लोकांनी सरकारवर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका,” असंही आवाहन त्यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray speaks about condition in state contacted cm uddhav thackeray gave advice jud
First published on: 23-03-2020 at 14:01 IST