जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनातील भाषणाची सुरुवात केली. राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्व स्वीकारलंय याची ओळख पटवून देणारं हे वाक्य होतं. एवढंच नाही तर त्यांनी जी सुरुवात केली त्यामुळे तमाम महाराष्ट्राला आठवले ते बाळासाहेब ठाकरे. कारण बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो… अशीच करत असत.  आजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाची सुरुवात हे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करत असत. त्यांच्या भाषणात हिंदू हा शब्द आज पहिल्यांदाच आला.

त्यांनी ज्या आक्रमक पद्धतीने भाषणाची सुरुवात केली त्यामुळे ते भाषण ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. या महाअधिवेशनातील भाषणात राज ठाकरे यांनी हिंदुत्व हा मुद्दा पुढे आणत झेंड्याचा रंग का बदलला हेदेखील स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो……” नी राजसाहेबांच्या भाषणाला सुरुवात #महाअधिवेशन

— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020

मनसेच्या अधिवेशनात झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली ती सोशल मीडियाच्या मुद्द्यावरुन. एकाही मनसैनिकाने किंवा पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. सोशल मीडियावर जर काही वादग्रस्त पोस्ट केल्या तर त्याला पदावरुन हटवण्यास मी विलंब करणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसंच आपल्या भाषणातून त्यांनी हिंदुत्व हे किती महत्त्वाचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. CAA, NRC आणि NPR याविरोधात जे मोर्चे काढले जात आहेत त्यामध्ये सहभागी होणारे मुसलमान हे खरंच भारतातले आहेत का? हे तपासयाला हवं. जर ते भारतातले नसतील आणि त्यांना इथले मुसलमान पाठिंबा देणार असतील तर आम्ही त्यांची पर्वा का करायची? असंही राज त्यांच्या भाषणात म्हणाले.  ९ फेब्रुवारी रोजी मनसेचा CAA, NRC, NPR या मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात जे सत्ता समीकरण मांडलं गेलं त्याबाबत राज ठाकरेंनी बोलणं टाळलं. त्या सगळ्याचा समाचार २५ मार्च रोजी होणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्यात घेईन असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.