स्थानिक वाहनांसाठी नियमानुसार सूट देण्यात आली असताना संबंधित ठेकेदार पारगमन शुल्काच्या नावाने स्थानिकांकडूनही बेकायदेशीरपणे वसुली करीत असून पालिका प्रशासनाने त्याकडे डोळेझाक करण्याची भूमिका घेतली आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला आहे. दोन दिवसात पालिकेने ही वसुली थांबवून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा पारगमन शुल्काच्या विरोधात मनसेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या मालवाहक वाहनांसाठी पारगमन शुल्क आकारले जाते. पूर्वी १०० रुपये असणारे हे शुल्क गतवर्षी २०० रुपये करण्यात आले. खाजगी जकात ठेकेदाराकडून हे शुल्क वसूल केले जाते. या शुल्कातून स्थानिक वाहनांना वगळण्यात आले असूनही ठेकेदार मनमानी पद्धतीने अनेकदा स्थानिकांकडूनही हे शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याच कारणास्तव दोन दिवसांपूर्वी टेहरे फाटय़ावर पाटील व ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी पाटील यांनी मारहाण व दमदाटी केल्याची फिर्याद या कर्मचाऱ्यांनी दिल्याने छावणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या पाश्र्वभूमीवर, घेतलेल्या पत्रकार परिषदेत जकात व पारगमनशुल्क वसुली करताना खाजगी ठेकेदाराची दंडेलशाही सुरू असल्याचा आणि पालिका प्रशासनाची त्यास मूकसंमती असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच स्थानिकांनी पारगमन शुल्क देण्यास नकार दिल्यास ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भरूदड सहन करावा लागत असल्याने ते हवालदिल झाले आहेत. या शिवाय, ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी विकत घेतलेले नवीन वाहन नुसते शहरात आले तरी जकात वसुलीचा आग्रह धरला जातो. त्यातून अनेकदा हे कर्मचारी दमदाटीने जकात वसुली करीत असतात, असा आरोप त्यांनी केला. पारगमन शुल्क दुप्पट करण्याच्या पालिकेच्या भूमिकेबद्दलही पाटील यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार एखाद्या शुल्कात वाढ करावयाची झाल्यास आधीच्या दरात फार तर १५ टक्क्यांपयरंत वाढ करता येते. मात्र पालिकेने तब्बल १०० टक्के वाढ करण्याचा निर्णय कोणत्या निकषाच्या आधारावर घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.