किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुनिल आनंदराव ईरावार (वय 27 वर्षे) यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना रविवारी सकाळी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका, असा उल्लेख केला आहे.

आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या छोट्याशा पत्रात त्यांनी आपल्या आईची व कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे. यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार गजानन चौधरी हे करीत आहेत. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना पार्थिव सोपविण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, काका, काकू, तीन भाऊ व दोन वहिनी असा परिवार आहे.

रविवारी (ता. १६ )  सकाळी सातच्या सुमारास कुटूंबीयांनी दरवाजा ढकलला तेव्हा सुनिलचा साडीने गळफास घेतलेला मृतदेह लटकतांना आढळून आल्याने हंबरडा फोडला. आजूबाजूला सर्वत्र गर्दी झाली. बातमी मिळताच किनवट पोलिस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना सुसाईड नोट मिळाली . त्यात असे लिहिले की ,

” “राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’ यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका.”
  .. आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, मला माहित आहे . मी माफ करायच्या लायकीचा नाही, तरीपण तुम्ही मला माफ करशाल अशी अपेक्षा बाळगतो. “

– तुमचाच सुनिल

ग्राम विकास , स्वच्छता, वैद्यकीय सुविधा अशा विविध सामाजिक बाबींसाठी सदैव पुढाकार घेणारे सुनिल ईरावार हे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना, किनवटचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे किनवट शहराध्यक्ष होते. त्यांचा सुस्वभाव व आपुलकीची वागणूक यामुळे तरुणांचा घोळका नेहमी त्यांच्या अवती भवती असायचा. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिस अधिक तपास करीत आहे .