विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ महिना होत आला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत सादर करण्यात यश आले नसल्याने राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याच सत्तेच्या गोंधळात सोशल नेटवर्किंगवरही जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी राज्यात सुरु असलेल्या या राजकीय गोंधळावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘युतीया बनवायचा धंदा राजकारण्यांनी थांबवावा,’ असा टोला खोपकर यांनी लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोपर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या पोस्टमध्ये राज्यातील शेतकऱ्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असताना राजकारण्यांकडे त्यांचे डोळे पुसण्यासाठी वेळ नाही अशी खंत खोपकर यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली होती. “अन्नदात्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात असताना त्याला आधार देण्याची गरज आहे. ओल्या दुष्काळाने ओले झालेले त्यांचे डोळे पुसायला कुणीच नाही. शिवसेना-भाजपाचा सगळा वेळ निव्वळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी जातोय. आता खरचं या गलिच्छ राजकारणाचा किळस यायला लागला आहे. बस करा आता युतीया बनवण्याचा धंदा,” अशी पोस्ट खोपकर यांनी केली आहे. ट्विटवरुन मनसेच्या एका पेजने या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट ट्विट केला आहे. हा स्क्रीनशॉर्ट खोपकर यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रिट्वीट केला आहे.

काही दिवसांपूर्वीच खोपकर यांनी “राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून आज राज ठाकरे हे नेता म्हणून किती भक्कम आहेत हे जाणवतं,” अशी एक पोस्ट सोशल नेटवर्किंगवरुन केली होती. “माझ्या राज्यात इतकी अस्थिर राजकीय परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही. उत्तरेतल्या किंवा दक्षिणेतल्या राज्यात सत्तापिपासू पक्षांमध्ये चालणारी साठमारी अनेकदा पाहिली. त्यावेळी आपल्या राज्यातल्या राजकीय संस्कृतीचं आणि प्रगल्भ मतदारांचं कौतुक वाटायचं. पण आता ती परंपरा संपली असं वाटतंय. मतदार अजूनही प्रगल्भ आहे, पण त्यांच्या मतांना किंमत न देणारे आता आपल्या बोकांडी बसणार हे दिसायला लागलं. सगळा देश या सत्तानाट्याकडे बघून हसत असेल, हा विचार करुन या कुडमुड्यांची जरा जास्तच किळस वाटायला लागलाय. राज्यातील मतदारांनो, तुमच्या दु:खात मी सहभागी आहे,” असं या पोस्टमध्ये खोपकर यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amey khopkar slams shivsena bjp alliance scsg
First published on: 20-11-2019 at 14:57 IST