Prakash Mahajan Quits MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून मनसेमध्ये कार्यरत असणारे प्रकाश महाजन यांच्या अचानक राजीनाम्यामुळे पक्षसंघटनेत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. प्रकाश महाजन यांनी मनसेची बाजू माध्यमांत जोरकसपणे मांडण्याचे काम केले होते. मध्यंतरी त्यांनी नारायण राणेंवरही जोरदार टीका केली होती. तसेच जुलै महिन्यात पक्षाच्या मेळाव्याचे निमंत्रण न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना प्रकाश महाजन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “राज ठाकरेंना मी मनातून काढू शकत नाही. मी फक्त अमित ठाकरेंचा अपराधी आहे. मी त्यांच्या मुलाबरोबर काम करण्यास तयार आहे, असे मी सांगितले होते. पक्ष सोडण्याचा निर्णय मी एकाएकी घेतलेला नाही. यामागे अनेक महिन्यांचा विचार आहे. जुलै महिन्यापासूनच मी नाराज होतो”, असे प्रकाश महाजन म्हणाले.
मला फक्त प्रचारात वापरून घेतलं
प्रकाश महाजन पुढे म्हणाले, मला विधानसभा निवडणुकीत फक्त प्रचार करण्यासाठी वापरून घेतले. पण मला पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. ज्यांच्या अपेक्षा कमी असतात त्यांचीच जास्त उपेक्षा होते, असे मला वाटत आहे. त्यामुळे मी आता थांबायचा निर्णय घेतला.
मी फक्त अमित ठाकरेंचा अपराधी
प्रकाश महाजन म्हणाले की, मी मनसेत अपराधी असेल तर तो फक्त अमित ठाकरेंचा. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत मी जाहीर बोललो होतो की, अमितजी मी तुमच्याबरोबरच काय तर तुमच्या मुलाबरोबरही काम करेन. पण मनुष्य विचार एक करतो आणि नशीब दुसरेच काही ठरवतो. क्षमता असून मला काम मिळाले नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही.
दोन भाऊ एकत्र आलेले आपल्या डोळ्यांनी पाहिले, आता बस झाले. आपले काम संपले. पक्ष मला काहीतरी जबाबदारी देईल. प्रचारात आणि पक्ष संघटनेत काहीतरी जबाबदारी दिली जाईल, अशी माझी अपेक्षा होती. मात्र असे काहीही घडले नाही, अशी खंतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे प्रकाश महाजन यांनी जुलै महिन्यातच पक्ष सोडण्याबद्दल एक विधान केले होते. “मी देव बदलणार नाही. हे कालही सांगितले आणि आजही सांगत आहे. मी गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच जाईल. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर आवडलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे”, असे विधान प्रकाश महाजन यांनी केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जुलै महिन्यात झालेल्या राज्यव्यापी शिबिराला निमंत्रित न केल्यामुळे ते नाराज होते. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. ‘पक्षाने मला साथ दिली नाही, पक्षाची सध्या दिवाळी सुरू आहे, पण माझ्या घरी अंधार आहे, पक्षात किंमत नाही. तुम्ही प्रवक्त्याला एवढे तुच्छ समजता का?’ अशा शब्दात महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली होती.