पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नुकताच भाजपानेते मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीबाबतचे फोटो मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन शेयर केले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

”माझे मित्र आणि मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे छत्रपती शिवरायांचा मेघडंबरी पुतळा देऊन स्वागत केले. राजकीय चौकटीपलिकडे आमची मैत्री गेल्या दीड दशकांपासून अविरत निभावली जात आहे”, असे ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे हे नाराज असल्याची चर्चा होती. राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणे शक्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आणि शहर मनसे विरुद्ध वसंत मोरे असा संघर्ष सुरू झाला होता. पक्षाने अलीकडेच त्यांच्याकडील शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. त्यामुळे वसंत मोरे नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आपण राजमार्गावरच आहोत, पक्ष सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी जाहीर केले होते. दरम्यान, आता त्यांनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतल्याने वसंत मोरे भाजपात जाणार का? ही चर्चा रंगू लागली आहे.