महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात भाष्य केलं. हे भोंग काढले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवून असं राज यांनी यावेळेस म्हटलं. तसेच मशिदी आणि मदरशांवर छापे टाकण्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. मात्र या भूमिकेमुळे मनसेमधील अनेक मुस्लीम पदाधिकारी नाराज झाले आहेत. पुण्यामध्ये तर अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिलेत. तर दुसरीकडे कल्याणसारख्या भागामध्ये जिथून मनसेचा एकमेव आमदार निवडून आलाय त्या मतदारसंघामधील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आता कोणासमोर व्यक्त व्हायचं असा प्रश्न उपस्थित केलाय. असं असतानाच सोलापूरमध्ये मात्र मुस्लीम शहराध्यक्षाने राज ठाकरेंच्या भोंगेविरोधी भूमिकेचं स्वागत केलं आहे.

नक्की वाचा >> पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”

सोलापूरचे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकाला पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरेंनी मुस्लिमांना विरोध केलेला नाही असं सांगताना शेख यांनी अगदी भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम, टेनीसपटू सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांची उदाहरणही दिली आहे.

“दोन तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्तच्या मेळाव्यात जी भूमिका मांडलीय त्या भूमिकेला मी मनसेचा सोलापूर शहराध्यक्ष या नात्याने समर्थन करतो,” असं शेख म्हणालेत. तसेच पुढे बोलताना, “बंधूंनो साहेबांनी मुस्लीम समजाच्या नमाज पठणाला विरोध केलेला नाहीय किंवा अजानला विरोध केलेला नाहीय,” असं शेख यांनी मुस्लीम समाजाला उद्देशून म्हटलंय. तसेच राज यांच्या भूमिकेमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही असा विश्वास व्यक्त करताना, “महाराष्ट्रात शांतता सुव्यवस्था राखली पाहिजे याचा विचार राज ठाकरे सर्वात आधी करतात,” असं शेख यांनी म्हटलंय.

“बंधूंनो मी एवढचं सांगू शकतो की कसाबसारखी कृती करणाऱ्यांना राज ठाकरेंचा विरोध आहे. एपीजी अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशासाठी चांगलं काम करण्यांचा राज ठाकरे आदर करतात. इरफान पठाण असेल सानिया मिर्झासारखे खेळाडू असतील जे देशासाठी चांगलं खेळले आहेत त्यांचं समर्थनच राज ठाकरेंनी आजपर्यंत केलं आहे,” असं शेख म्हणाले आहेत.