सलग पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे उडालेली तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना पाहून केंद्रीय दुष्काळ व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय सोनी हेलावले. यंदा पाऊस होईल या आशेने पेरलेली बाजरी तसेच मुगाच्या पिकाची करपलेली अवस्था त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रित करून शेतकऱ्यांची ही व्यथा सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन सोनी यांनी दिले.
आमदार विजय औटी यांनी शासनाकडून प्रतिमाणशी केवळ वीस लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिल्याचे सोनी यांच्या निदर्शनास आणून दिले. सोनी यांनी त्याचीही दखल घेत यावर समितीच्या बैठकीत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास सोनी हे तालुक्यातील अस्तगांव येथे पोहोचले. जिल्हाधिकारी अनिल कवडे हे त्यांच्यासमवेत होते. आ. विजय औटी, सभापती गणेश शेळके यांनी उभयतांचे स्वागत केल्यानंतर तेथील मीराबाई अंबादास काळे यांच्या शेतातील करपलेल्या बाजरीच्या पिकाची पाहणी केली. या गावात एकूण किती हेक्टर क्षेत्रावर व कोणत्या पिकांची पेरणी झाली आहे, किती वर्षांपासून पाऊस अनियमित आहे, याची सखोल माहिती सोनी यांनी या वेळी घेतली.
रायतळे, वाळवणे, रुईछत्रपती तसेच सुपे येथील पवारवाडीच्या तलावाला या पथकाने भेट दिली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह दुष्काळ निवारणाची स्थिती अतिशय योग्य पद्घतीने हाताळल्याचे औटी यांनी सोनी यांना सांगितले. दुष्काळ निवारणासाठी जिल्हाधिका-यांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे असेही औटी यांनी सूचित केले.
सारोळा कासार व अकोळनेर ही नगर तालुक्यातील गावे दोनतीन वर्षांपूर्वी दूध उत्पादनात अग्रेसर होती. पाण्याअभावी आता त्यांचा दूधधंदा पूर्ण कोलमडला आहे. एकनाथ पाटीलबा भोर, राजेंद्र भोर, नानासाहेब जाधव आदींनी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली
महिलांनी पथकाला अडवले
पाण्यासाठी पथकाला रस्त्यात अडवण्याचेही प्रकार घडले. मोहोज खुर्द येथे रिकामे हंडे घेतलेल्या महिलांनी पथकाचे स्वागत केले. खाडे वस्तीवरील महिलांनीही पथकाला पाण्यासाठी रस्त्यात अडवले.
खासदार गांधी अनुपस्थित
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येऊनही दक्षिण जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे खा. दिलीप गांधी अनुपस्थित (पाथर्डी व नगरच्या दौ-यात) राहिल्याने विशेष चर्चा रंगली होती. गांधी यांच्याऐवजी उत्तरेतील सेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनीच नागरिकांचे प्रतिनिधित्व केले. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, नगर पंचायत समिती सभापती संदेश कार्ले, पारनेरचे आमदार विजय औटी यांनी शेतक-यांच्या व्यथा मांडल्या.
निळवंडे कालव्यांचीही पाहणी
पाथर्डी तालुक्यातील पाहणी झाल्यावर पथकातील प्रमुख सदस्य व्ही. रथ यांना खा. लोखंडे नगरहून निळवंडे धरण कालव्याच्या पाहणीसाठी घेऊन गेले. हे कालवे गेली ४० वर्षे रखडले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची गरज आहे. पथकाच्या अहवालानंतर कालव्यांचा व त्याखालील शिर्डीसह १८० गावांचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile shooting of burned crops by central team
First published on: 20-08-2015 at 03:15 IST