राज्य व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमात फिरते लोक अदालत कार्यक्रमासाठी मोबाइल व्हॅन सुरु करण्यात आली असून, ही मोबाइल व्हॅन पुढील महिनाभर जिल्ह्य़ात विविध गावात जाणार आहे. या मोबाइल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, न्यायाधीश सुनीलजित पाटील यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात करण्यात आला.
प्राधिकरणच्या माध्यमातून लोकअदालतचे आयोजन करण्यात येते, मात्र सर्व पक्षकार लोकअदालमध्ये येऊ शकत नाही, म्हणून राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ‘न्याय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करुन मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून फिरते लोकअदालत ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबवत आहे. नगरमध्ये फिरती लोकअदालतचे आगमन झाल्यावर पुढील एक महिन्यात पूर्ण जिल्ह्य़ात मोबाइल व्हॅन जाणार आहे. एकमेकांमधील तंटे-वाद सामोपचाराने मिटवून न्यायालयावरील ताण कमी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकअदालत शिबिरांचे आयोजन करणार आहे. या फिरत्या लोकअदालतच्या गाडीत न्यायाधीश, वकील व पक्षकार यांना एकत्र बसवून लोकअदलतच्या माध्यमातून तंटे सोडविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या फिरत्या लोकअदालतचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
फिरते लोकअदालत मोबाइल व्हॅनचे स्वागत करु न पाटील यांनी जिल्ह्य़ात फिरण्यासाठी हिरवा झेंडा दाखवून कामकाजास सुरुवात केली. या वेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष काकडे, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, पॅनेल सदस्य शिवाजी कराळे, विक्रम वाडेकर, आर. जी. बर्डे, रफिक बेग, सुजाता कुमार, सुजाता गुंदेचा, अशोक बाशिर्कर, चेतन रोहोकले, प्राधिकरणाचे अधीक्षक पी. डी. ताकसाळे, एन. बी. देशमुख, योगेश हळगांवकर, विराज ठाकूर आदिंसह वकील उपस्थित होते.