देशात ‘मोदी फॅक्टर’ तर साता-यात ‘उदयनराजे फॅक्टर’ चालतो. कोणत्याही पक्षात जाण्याचा आत्ताच विचार नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी १८ तारखेनंतर बोलेन. सातारकरांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच मी इतक्या मताधिक्याने निवडून आलो. ज्यांची अनामत गेली त्यांनी आता तरी विचार करावा, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या विजयानंतर व्यक्त केली.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होताच खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी जल्लोष केला. या वेळी त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले आणि आई कल्पनाराजे भोसले हजर होत्या. भोसले यांनी मतमोजणी सुरू असलेल्या जळगाव (कोरेगाव) येथील वखार महामंडळाच्या गोदामास भेट दिली. तेथे त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामास्वामी यांच्याकडून प्रमाणपत्र स्विकारले. त्यानंतर पवईनाका येथील शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ास समर्थकांसह पुष्पहार अर्पण केला. या वेळी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ढोल लेझिम व डॉल्बीच्या ठेक्यात कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात विजयी मिरवणूक जलमंदिराकडे (निवासस्थानाकडे) रवाना झाली. उदयनराजेंनी उघडय़ा टपाच्या जीपमधून नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. या वेळी आम आदमी पार्टीचे राजेंद्र चोरगे यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.