महिला पोलिसांवरील विनयभंगाचा गंभीर गुन्हा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झाला असल्याने त्यांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.    
जिल्ह्य़ातील भाजपा-शिवसेना युतीच्या आमदारांनी आज पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांची भेट घेऊन ज्योतिप्रिया सिंग यांच्यासह पोलीस कर्मचा-यांवर नागरिकांवर लाठीमार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ज्योतिप्रिया सिंग यांनी कोल्हापुरातील राजकारणी, गुन्हेगारी वर्तुळ, प्रांतवाद यावर आसुर ओढले. त्या म्हणाल्या, विसर्जन मिरवणुकीवेळी आमदार क्षीरसागर यांनी चिथावणीखोर भाषण केल्यामुळे जमावाने पोलिसांवर चप्पल आणि दगडफेक केली. त्यामुळेच पोलिसांना प्रत्युत्तरादाखल लाठीमार करणे भाग पडले. खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांना मिरवणुकीतून पुढे जाण्याची गरज वाटत होती. पण ते भाषणबाजीमुळे अडकून पडले होते. मानवाधिकार हा सर्वासाठी आहे. तो जनता, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी आहे तसाच तो पोलिसांसाठीही आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले जात असताना जमाव दगडफेक करू लागला. तर पोलिसांनी कृती न करता बघतच बसायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.    
मी आयपीएस अधिकारी असल्याने कुठेही बदली झाली तरी मला त्याची भीती नाही. कोल्हापुरात नेमणूक व्हावी, अशी मागणी मी केलेली नव्हती. मी भ्रष्टाचार मुक्त अधिकारी असल्याने मला कोणाचे भय नाही. मटका, जुगार, अवैध धंदे करणा-यांवर कायद्याच्या चौकटीत मी कारवाई करीत असल्याने त्याचा त्रास कायद्याचे पालन न करणा-यांना होत असतो. अशा दहा टक्के लोकांसाठी मी नव्वद टक्के नागरिकांना वा-यावर सोडू शकत नाही. मी जनतेची असून मला निवडणूक लढविण्याची गरज नाही. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असतांना त्याचे शांतताप्रेमी नागरिकांनी स्वागतच केले आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने मी पंजाबची आहे की उत्तरप्रदेशची या मुद्दय़ाला कसलेच महत्त्व राहत नाही. जिथे महिलांचा सन्मान ठेवला जात नाही तेथे प्रगती होत नाही, असे नमूद करून त्यांनी धटींगशाहीकरणा-या प्रवृत्तीवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molestation crime against rajesh kshirsagar of police
First published on: 21-09-2013 at 12:15 IST