गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांता मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांत दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात दोन, लातूरमध्ये एक, नांदेडमध्ये चार, बीडमध्ये दोन तर हिंगोलीमध्ये एक अशा दहा आत्महत्यांची नोंद झाली आहे.
उस्मानाबादेत कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील रत्नाकर माळी यांनी गळफास घेऊन, तर तुळजापूर तालुक्यातील महिला शेतकरी सोजरबाई मधुकर पाटील यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली. लातूरमध्ये देवंग्रा (तालुका चाकूर) येथील शिवाजी तांदळे, नांदेडच्या बिनताळे (तालुका उमरी) येथील कुंडलिक व्यंकटी मंतलवाड, सगरोळी (तालुका बिलोली) येथील कामाजी शंकरराव अंबेराय, मांडवी (तालुका किनवट) येथील नंदू दुलसिंग राठोड व बुधवारपेठ येथील ओंकार सीताराम झुगनाके या चारजणांनी गारपिटीमुळे नुकसानीचा धसका घेऊन जीवन संपविले.
बीडच्या मोहिखेड गावातील सतीश बबन साळुंके, धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील संपत्ती रामा दराडे, तसेच िहगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सौना येथील बबनराव नाईक यांनी विष पिऊन आत्महत्या केली. सोलापूर जिल्ह्य़ातील कुर्डुवाडी तालुक्यातील मदने वस्ती या गावात सोमना मदने (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. गारपिटीने त्याच्या शेताचे नुकसान झाले होते. त्यातच त्याच्यावर कर्जही झाले होते. त्यामुळे कंटाळून त्याने आत्महत्या केली.