लाच प्रकरणात अटक केलेल्या महापालिकेचा नगररचनाकार विश्वनाथ दहे याच्या घरातून व बँक लॉकर्समधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुमारे ३० लाखाहून अधिक रोकड, सोन्याचे दागिने, गुंतवणूकपत्रे हस्तगत केली. याशिवाय दहे याची औरंगाबाद व पैठण येथे १५ एकर शेतजमीन आढळली. दहे याला अटक करतानाच त्याच्या घरातून ९ लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
मनपाचा नगररचनाकार दहे याला इस्टेट एजंट सचिन कटारिया याच्याकडून ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी रात्री पाइपलाइन रस्त्यावरील राहत्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली, त्याला मंगळवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आहे. कटारिया याची केडगाव बायपासजवळ, मनपा हद्दीत जमीन आहे. त्यावर आरक्षण असल्याने बदल्यात टीडीआर मंजूर करण्यासाठी दहे याने १८ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ४ लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.
पथकाने दहे याच्या औरंगाबादमधील घराची झडती घेतली. तेथे २ लाख ३७ हजार ५०० रुपये, पावणे दोन लाख रुपये किमतीचे ७० ग्रॅम वजनाचे दागिने, बँक लॉकर्समध्ये १ लाख ६५ हजार रुपयांचे ५५ ग्रॅम दागिने, १७ लाख २५ हजारांची गुंतवणूकपत्रे, बँकेतील खात्यावर ६ लाख ४८ हजार रुपये आढळले. याशिवाय औरंगाबाद व पैठण येथे १५ एकर जमीन, मानवत (परभणी) येथे ४ खोल्यांचे घर आहे.
दहे याच्या कोठडीची मुदत मंगळवापर्यंत आहे, त्या वेळी त्याला पुन्हा न्यायालयापुढे हजर करून तपासाची प्रगती सादर केली जाणार आहे. अधिक तपास उपअधीक्षक अशोक देवरे करत आहेत.