महाराष्ट्रात २०१२ ते २०२२ या १० वर्षांत संक्रमित रक्त दिल्याने १४४२ निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच हजारो नागरिकांना हिपॅटायटीस ‘बी’ आणि ‘सी’ची लागण झालेल्यांचीही समोर आलं आहे. ‘पेशंट राईट्स फोरम’ या संस्थेने आरटीआय कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी पुढे आली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा – Girgaon LIC Building Fire : मुंबईतील गिरगावमध्ये LIC इमारतीला आग

यासंदर्भात बोलताना ‘पेशंट राईट्स फोरम’चे राज खंडारे म्हणाले, गेल्या वर्षी नागपूरमध्ये १२ थॅलेसेमियाच्या रुग्णांना संक्रमित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली होती. हे सर्व रुग्ण १० वर्षांखालील होते. तर पाच वर्षांच्या दोन मुलांचा यामुळे मृत्यूही झाला होता. ही बाब चिंताजनक होती. त्यानंतर आम्ही १० वर्षांत एचआयव्ही झालेल्या रुग्णांची माहिती माहिती मागवली. त्या माहितीतून १० वर्षांत संक्रमित रक्तामुळे १४४२ निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याचं पुढे आलं आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना MSACS च्या उपसंचालक निलम लवंद म्हणाल्या २०१२ ते २०२२ या १० वर्षात एकूण १.९९ लाख एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १४४२ रुग्णांना संक्रमित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली. संक्रमित रक्तामुळे एचआयव्ही होण्याचं प्रमाण २०१२ च्या तुलनेत १.२० टक्क्यांनी वाढलं आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे रुग्णांना NAT चाचणी केलेले रक्त देणं आवश्यक आहे. मात्र, ही यंत्रणा राज्यातील मोजक्या रक्तपेढ्यांमध्येच उपलब्ध आहे.

हेही वाचा – ‘मी मोठा शेठ’ म्हणत प्रवाशांची फसवणूक, बघता बघता दागिणे लुटायचे; लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना बेड्या

‘पेशंट राईट्स फोरम’चे राज खंडारे यांनीही NAT चाचणी प्रणाली सुरू करण्याची मागणी केली आहे. आज शेकडो रुग्ण एचआयव्हीचा बळी ठरत आहेत. तर भविष्यातील लाखो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जोपर्यंत सर्व सरकार रुग्णालयात NAT चाचणी प्रणाली सुरू होत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही, असं ते म्हणाले.