लोकसभा निवडणुकीसाठी एकिकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात राजकीय मंडळी मग्न असताना उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलेल्या बागलाण तालुक्यात आणखी एकाने आत्महत्या केल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या चारवर पोहचली आहे. वाघळे येथील देविदास दशरथ भामरे (३५) यांनी एक एकरात डाळिंब बाग लावली होती. गारपिटीने त्यांची बाग उद्ध्वस्त झाल्याने हताश झालेल्या देविदास यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील आहेत. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जळगावच्या अमनेर तालुक्यातील पातोंडा येथे राजेंद्र भिमराव पाटील (४०) या शेतकऱ्याने दुपारी एकच्या सुमारास घरातच गळफास घेतला. चार बिघा जमिनीत राजेंद्रने कपाशी लागवड केली होती. अलिकडे आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे कपाशीचे पूर्णपणे नुकसान झाले होते. राजेंद्रवर आधीच विविध कार्यकारी संस्थेचे ५० हजार रूपये कर्ज आहे. याशिवाय उसनवारीचे ५० हजार रूपये देणे आहे. कपाशीचे नुकसान आणि कर्ज यामुळेच राजेंद्रने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. राजेंद्रच्या पश्चात १६ वर्षांची मुलगी, मुलगा व पत्नी आहे. अमळनेर तालुक्यातील ही सहावी शेतकरी आत्महत्या आहे.