राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे एक वर्षाचे बाळ महिन्याभराने त्याच्या आईला भेटले. पुण्यातील मगरपट्टा भागात वास्तव्य करणाऱ्या पुनम आणि सचिन फुसे यांचा ११ महिन्यांचा मुलगा २० मार्चपासून पुनम यांच्या आई वडिलांकडे होता. लॉकडाउनमुळे आई आणि मुलगा यांची ताटातूट झाली होती. लॉकडाउन सुरु झाला त्यावेळी पुनम आणि सचिन फुसे यांचा मुलगा त्याच्या आजी आजोबांकडे होता. त्यांना वाटलं की लॉकडाउन संपेल मात्र तसे झाले नाही. लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झालं.

आपल्या बाळाला भेटण्यासाठी पुनम यांची धडपड सुरु होती. या बाळाचे आजी-आजोबाही अस्वस्थ झाले. या सगळ्या समस्येतून वाट काढण्यासाठी मदतीला धावल्या त्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे. पूनम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला. या घटनेचं गांभीर्य ओळखून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याकडे संपर्क केला. तसंच पुनम यांना डिजिटल पास मिळेल का यासाठी प्रयत्न केला.

#CoronaVirus #Lockdown @supriya_sule pic.twitter.com/ngY2gh214i

— LoksattaLive (@LoksattaLive) April 22, 2020

शहराची हद्द ओलांडली जाणार होती. शहरांच्या सीमा सील करण्यात आल्याने डिजिटल पास मिळणं कठीण होतं. मात्र गृहखात्यातील अधिकाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी पुनम यांची अवस्था काय झाली आहे, त्यांच्या मुलाची आणि त्यांची ताटातूट कशी झाली हे समजावून सांगितलं. अखेर फुसे दाम्पत्याला डिजिटल पास २० एप्रिलला मिळाला. त्यानुसार दाम्पत्याने २१ एप्रिलला म्हणजेच काल प्रवास करुन आपल्या बाळाला सोबत आणले. योगायोग असा की २१ एप्रिल म्हणजे कालच या बाळाचा वाढदिवसही होता.

आईने बाळाला आणि बाळाने आईला पाहताच दोघेही रडू लागले. मात्र नंतर दोघांनाही झालेला आनंद गगनात मावणारा नव्हता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे आई आणि मूल भेटले. फुसे कुटुंबीयांनीही खासदार सुप्रिया सुळे आणि मनाली भिलारे यांचे आभार मानले आहेत.