कराड : ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजामध्ये जनजागृती घडवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना विविध शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षेवरील सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा समावेश ‘कमवा आणि शिका’ योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक लाभाबरोबरच अनुभव व आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. क्विक हील फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची अंमलबजावणी केली जात असून, दोन जुलै रोजी पुण्यातील क्विक हील फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळाही पार पडली आहे.

कार्यशाळेत क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्ष अनुपमा काटकर, तसेच सहकारी अजय शिर्के, गायत्री केसकर, साक्षी लवंगरे आणि दीपू सिंह यांनी सायबर गुन्हेगारी, तिचे परिणाम व प्रतिबंधक उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. क्लबमध्ये प्रतीक गुंजाळकर, अनुराग वाझरकर, प्राजक्ता पवार, वैष्णवी निकम हे विद्यार्थी सक्रिय सदस्य असून, प्रशिक्षणात या विद्यार्थ्यांनी, तसेच मार्गदर्शक प्राध्यापिका डॉ. प्रियांका शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायबर सुरक्षेबाबत समाजात सकारात्मक लाट निर्माण होणे आणि विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असून, सहभागी विद्यार्थ्यांनी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.