फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेच्या हालचाली; विलंबाचे खापर शिवसेनेवर

सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकडून सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणावर आतापर्यंत संयम बाळगणाऱ्या भाजपने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार सत्तेत येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने सत्तास्थापनेतील विलंबाचे खापर शिवसेनेवर फोडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीचा दौरा केला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर प्रथमच सामूहिक प्रतिहल्ला चढवला. भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मंगळवारी दुपारी ‘वर्षां’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक आदी उपस्थित होते.

‘‘महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला सत्तास्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करून आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सत्तावाटपाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारे २४ तास खुली आहेत,’’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भाजपच्या सर्व आमदारांनी फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भाजप फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल,’’ असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर प्रतिहल्ला चढवला. आम्हाला शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन करायचे असून त्यासाठी शिवसेनेने चर्चेला तयार झाले पाहिजे. चर्चा झाली की कोणत्याही क्षणी युती झाल्याची गोड बातमी येईल. शिवसेनेचे सर्व पर्याय खुले असतील तर भाजपचीही दुसरी योजना तयार आहे, असा सूचक इशारा मुनगंटीवार यांनी दिला.

‘‘महायुतीला स्पष्ट बहुमत देणारा निकाल आल्यानंतर शिवसेनेकडून सर्व पर्याय खुले असल्याची विधाने केली जात आहे. शिवसेनेची ही भूमिका राज्यातील मतदारांच्या जनादेशाचा अनादर करणारी आहे. निकाल लागून दोन आठवडे होत आले तरी चर्चाच करायची नाही, ही शिवसेनेची भूमिका असून त्यामुळेच सरकार स्थापनेला विलंब होत आहे. राज्यात शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची गरज आहे; पण चर्चाच करायची नाही असा शिवसेनाचा हट्ट असल्याने त्यास विलंब होत आहे,’’ असे गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मराठवाडा दौऱ्यादरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. सत्तास्थापनेवरून युतीत तिढा निर्माण झाला असला तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांबद्दल शिवसेनेला आस्था असल्याचा संदेश उद्धव यांच्या या भेटीद्वारे दिला गेल्याचे मानले जाते. सेनेने चर्चेला बसावे या भाजपच्या भूमिकेवर आणि पुढील वाटचालीबाबत उद्धव ठाकरे हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी बुधवारी चर्चा करतील, असे समजते. तसेच धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार असून, त्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

लेखी आश्वासनावर शिवसेना ठाम

मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केली. काहींच्या हट्टामुळे महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे जाणीवपूर्वक ढकलला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, सत्तावाटप कसे व्हावे याबाबत समोरासमोर बसून चर्चेतूनच तोडगा काढता येईल, असे त्यांनी सांगितले. पण, त्याच वेळी मुख्यमंत्री भाजपचा, तर उपमुख्यमंत्री सेनेचा असा भाजपचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर सत्तावाटपाबाबत कोणत्याही विषयावर चर्चा करायची भाजपची तयारी आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सत्तेत सेनेला वाढीव वाटा

मावळत्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला १३ मंत्रिपदे आली होती. सरकारमध्ये समान वाटा मिळावा, अशी शिवसेनेची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला वाढीव मंत्रिपदे तसेच चांगली खाती देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत मात्र भाजप कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. सेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि वाढीव मंत्रिपदे देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. मात्र, शिवसेनेशी जुळवून घ्यावे, पण जास्त झुकूही नये, अशी सूचना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना केली आहे.