आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिलाच, तर आपलीही तयारी असावी यादृष्टीने शिवसेना तयारीला लागली आहे. याचसंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी शनिवारी मुंबईला रवाना झाले.
येत्या दि. २७ ला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जगताप महापौरपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीत त्यादृष्टीने तयारी सुरू असून त्यांच्या राजीनाम्यामुळे होणारी महापौरपदाची निवडणूक लढवण्याबाबतची प्राथमिक तयारी विलंबाने का होईना, शिवसेनेने सुरू केली आहे. याबाबत उद्या (रविवार) सकाळी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमवेत बैठक होणार आहे. राठोड यांच्यासह पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दिलीप सातपुते शनिवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.
शिवसेनेत मुळातच ही निवडणूक लढवावी की नाही, याबाबत संभ्रम आहे. लढवली तरी पूर्ण ताकदीने लढवावी, की केवळ विरोधी उमेदवार देऊन निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करावी, याबाबत चर्चाच सुरू आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे, मात्र उमेदवार कोण याबाबत बरेच जण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत. भारतीय जनता पक्षाशी बोलणी करून तेही निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत की किंवा नाही, याचीही चाचपणी केली जाईल. मात्र मुख्यत्वे या निवडणुकीतील संभाव्या खर्चाचा आकडा हाच यातील कळीचा मुद्दा आहे. सध्या काहीही नावे पुढे आली तरी बहुधा अनिल शिंदे किंवा दिलीप सातपुते यांच्यावरच ही जबाबदारी येण्याची शक्यता या वर्तुळात व्यक्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement of mayor in shiv sena party leaders
First published on: 24-05-2015 at 03:40 IST