scorecardresearch

प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आंदोलन

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे वरिष्ठ अधिकारीच  शुक्रवारी आंदोलनाला असल्याचे पाहायला मिळाले.

अलिबाग  :-  लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे वरिष्ठ अधिकारीच  शुक्रवारी आंदोलनाला असल्याचे पाहायला मिळाले. प्रलंबित मागण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले होते. मागण्या मान्य न झाल्यास ४ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

   महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार  संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार सहभागी झाले होते. इतर ठिकाणी अधिकाऱ्यांनी काळय़ा फिती लावून काम केले. प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १८ एप्रिल रोजी सामूहिक रजा आंदोलनाचा तर ४ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा  इशारा त्यांनी दिला.

      नायब तहसीलदार याची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, तहसीलदार याची २०११ पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार म्हणून पदोन्नती करणे, तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती करणे, कालबद्ध पदोन्नतीचे आणि परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढावे, स्थायित्व प्रमाणपत्र, प्रलंबित सेवा जोड प्रस्ताव, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, लाभ तात्काळ निकाली काढावे, महिला अधिकाऱ्यांचे महसूल विभाग वाटप करताना प्राधान्याने सोयीचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे या मागण्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी यावेळी सांगीतले. तहसीलदार, नायब तहसीलदार हे प्रशासनाचे महत्त्वाचे घटक आहेत.

नागरिकांच्या समस्येचे निराकरण तहसीलदार, नायब तहसीलदार करीत असतात. मात्र जनता आणि शासनाचा तालुकास्तरावरील मुख्य घटक असलेले तहसीलदार आणि नायब तहसीलदार याच्या प्रलंबित सेवाविषयक मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.  त्यामुळे या घटकाला अखेर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Movement tehsildar deputy tehsildar pending demands people question ysh

ताज्या बातम्या