गडचिरोली : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने महाराष्ट्रातील गडकिल्ले भाडे तत्त्वावर देण्याचा जो दुर्दैवी निर्णय घेतला आहे, त्यावरून फडणवीस सरकार आणखी काय काय करू शकते हे मतदारांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ले वाचवण्यासाठी शिवरायाच्या प्रत्येक मावळय़ाने रस्त्यावर उतरावे आणि या निर्णयाला तीव्र विरोध करावा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सत्ताधारी भाजप-शिवसेना कथित फोडाफोडीच्या व खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात यात्रा गडचिरोली जिल्हय़ात पोहोचली असता ते बोलत होते. खासदार कोल्हे यांनी मोदी सरकारच्या शंभर दिवस पूर्णत्वाच्या कारभारावर टीका केली. गडकिल्ले वाचवण्यासाठी आपण लोकांसोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कोल्हे यांनी यावेळी दिला. ही शिवस्वराज्य यात्रा युती सरकारला पायउतार करण्यासाठी आहे. तेव्हा लोकांनी लोककल्याणकारी काँग्रेस आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
धर्मरावबाबा आत्राम गैरहजर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम जाहीर सभा व इतर कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रकृती अस्वस्थतेमुळेच धर्मरावबाबा उपस्थित राहू शकले नाही, असे सांगितले जात असले तरी ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांनी अनेका भाजपाच्या नागपूरस्थित नेत्यांच्या भेटीही घेतल्या. मात्र माजी पालकमंत्री अंबरिश आत्राम यांच्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला खंड पडतो आहे, अशीही चर्चा आहे.