सांगली : नवीन बसच्या लोकार्पणावरून कवठेमहांकाळमध्ये शनिवारी आमदार- खासदार यांच्यातील श्रेयवाद उफाळून आला. समाज माध्यमावरून सुरू असलेल्या वादात सामान्य नागरिकांनीच बसची पूजा करून लोकार्पण करीत राजकीय श्रेयवाद मोडीत काढला. हा श्रेयवादाचा सामना समाज माध्यमावर रंगला असतानाच प्रशासकीय पातळीवरून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पूजन करून नवीन बसचा लोकार्पण सोहळाही पार पाडला.
सांगली जिल्ह्याला शंभर नवीन बस मिळाल्या आहेत. या बसचे विविध आगाराना वाटप करण्यात आले आहे. यापैकी १८ नवीन बस कवठेमहांकाळ आगारासाठी आल्या आहेत. आज या बसचा लोकार्पण सोहळा प्रशासकीय पातळीवर सकाळी दहा वाजता पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हा लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
आणखी वाचा-तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच राहणार, जीआर दुरुस्तीवर ठाम!
मात्र, मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष सुरू झाला. आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी प्रशासकीय वेळेपुर्वीच साडेनउ वाजता बसचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. तसे संदेश समाज माध्यमावरून शुक्रवारीच प्रसारित करण्यात आले. समाज माध्यमावरून ही माहिती मिळताच खासदार समर्थक गटाकडूनही साडेनऊ पुर्वीच लोकार्पण सोहळा उरकण्याचा घाट घालण्यात आला. या गटाकडून समाज माध्यमातून देण्यात आलेल्या संदेशामध्ये साडेआठची वेळ देण्यात आली.
श्रेयवादाचे राजकारण रंगताच सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेत आज सकाळी साडेआठ पुर्वीच नवीन बसचे वारकरी संप्रदायमधील आण्णा शिंदे, ईश्वर पवार यांच्या हस्ते पूजन करून बसचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर आमदार श्रीमती पाटील यांनी कार्यकर्त्यांसह आगारामध्ये येऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या हस्ते पूजन करून बसचे लोकार्पण केले, तर प्रशासकीय पातळीवरून अकरा वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते व खा.पाटील यांच्या उपस्थितीत १८ नवीन बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वहातूक अधिकारी वृषाली भोसले, आगार व्यवस्थापक आश्विनी किरगत आदींसह अधिकारी चालक, वाहक उपस्थित होते.