खासदार नवनीत राणा यांना एका मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरध्वनीवर सातत्याने शिवीगाळ, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी नवी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांच्या स्वीय सहायकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार नवनीत राणा यांच्या वैयक्तिक क्रमांकावर सोमवारी सायंकाळपासून सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत ११ वेळा कॉल करण्यात आले आहेत. एक मोबाईलधारक अज्ञात व्यक्ती नवनीत राणा यांना असभ्य भाषेचा वापर करून धमक्या देत आहे. तुम्हाला महाराष्ट्रात पाय ठेवू दिला जाणार नाही. हनुमान चालीसाचे पठण केले तर जीवे मारून टाकू, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे नवनीत राणा या मानसिक तणावाखाली असून या अज्ञात व्यक्तीची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही नवनीत राणा यांनी पोलिसांकडे आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार केली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांवर त्यांनी आरोपही केले होते. मात्र, आज दाखल केलेल्या तक्रारीत कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही. गेल्या महिन्यात राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा निर्धार केला होता. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. अजूनही राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद मिटलेला नाही. त्यातच ही नवी तक्रार समोर आली आहे.