Praniti Shinde भाजपा आणि महायुतीचे रोज बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात असा आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केला आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रणिती शिंदेंनी अभिवादन केलं. त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपावर हे आरोप केले आहेत.

काय म्हटलं आहे प्रणिती शिंदेंनी?

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि लोकशाही निर्माण केली आहे. संविधान आपण वाचवलं पाहिजे. जेव्हा सत्ताधाऱ्यांचे विचार हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, जेव्हा देशाचे गृहमंत्री म्हणतात की संविधान संविधान संविधान हे अभी फॅशन बन गया है, जर संविधान आणि बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की, लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. भाजपने जेव्हा ४०० पारचा नारा दिला होता, तेव्हा कोणाला माहिती होतं की, संविधान बदलण्यासाठी त्यांनी हा नारा दिला होता, पण त्यांचे पितळ उघडं पडलं पडलं. बाबासाहेबांना मानणारे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत संविधानाला आम्ही हात काय बोट पण लावू देणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी होते ही बाब विसरता येणार नाही असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे-प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, “जिथे हिटलरशाही आहे अमेरिका, रशिया किंवा आपला देश. सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत. आचार्य अत्रेचा काळ होता, जिथे प्रत्येक राज्यकर्त्यांचा बाबतीत ते विनोद करायचे. त्यावेळेस त्यांच्यावरती या थराला जाऊन कधी कोणी काहीही केलं नाही. पण आता हे व्यासपीठ राहिलेलं नाही, जे व्यासपीठ बाबासाहेबांनी दिलं ते राहिलंच नाही. जेव्हा तीन-तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होतो. केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे असाही आरोप प्रणिती शिंदेंनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देऊ म्हटलं होतं. आता ते म्हणत आहेत सगळी वचनं दिली ती पूर्ण केली जात नाहीत. ही फसवणूक आहे. बीडमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. या संदर्भातला व्हिडीओ समोर आला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे सगळं माहिती होतं तरीही ते हसत खेळत होते. या सरकारला आतला आवाजच उरला नाहीये. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलीस कोठडीत झाली आहे. तरीही सरकारने काही केलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तनिषा भिसे प्रकरणावरही प्रणिती शिंदेंचं भाष्य

आरोग्य व्यवस्था ढासळली असेल तर शासनाकडे त्याकडे लक्ष द्यायला हवं. साधं औषध घेतानाही लोकांचे हाल होत आहेत. आम्ही कधीपासून ही बाब सांगत आहोत. रुग्णालयात पैसे भरले नाहीत म्हणून महिलेचा जीव गेला. अशी प्रतिक्रिया त्यांनी तनिषा भिसे प्रकरणावर दिली. त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार मंगेशकरांबाबत काय बोलले हे मला माहीत नाही असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.