दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद मिळवताच खासदार संजयकाका पाटील यांनी आता राष्ट्रवादीचे एक सदस्य आपल्या गटात घेऊन नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्याचे खासदार असताना केवळ कवठेमहांकाळ नगरपंचायतीवरच लक्ष केंद्रित करण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी त्यांनी सुरू केली असल्याचेच मानले जात आहे. खासदार पुत्रासाठी राजकीय व्यासपीठ तयार करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

कवठेमहांकाळची नगरपंचायत म्हणजे फार मोठी सत्ता म्हणता येणार नाही. खासदार तर वाळवा व शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र अन्य मतदारसंघामध्ये फारसे फोडाफोडीचे राजकारण न करता केवळ कवठेमहांकाळमध्येच का रस घेतात हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. कवठेमहांकाळचा मतदारसंघ १५ हजारांच्या घरात आहे. लोकसभा मतदारसंघ किमान १५ लाख मतदारांचा आहे. म्हणजे मतदारसंघाच्या एक टक्का मतदार असलेल्या नगरपंचायतीची निवडणूक खासदारांनी एवढी प्रतिष्ठेची का केली हा खरा प्रश्न आहे. संजयकाका हे भाजपचे खासदार असताना भाजपच्या पक्षवाढीपेक्षा त्यांना स्वगट वाढीची चिंता अधिक असल्याचे कवठेमहांकाळच्या घटनेवरून दिसते. कारण त्यांच्या गटात असलेल्या नऊपैकी चार सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत, तर उर्वरित पाच सदस्य कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लोकांना सामोरे गेलेले नाहीत.

या तालुक्याचे यापूर्वी स्व. शिवाजीराव शेंडगे यांनी प्रतिनिधित्व केले, त्यानंतर मिरज तालुक्यातील गावांच्या भरवशावर अजितराव घोरपडे यांनीही प्रतिनिधित्व केले. मतदारसंघ पुनर्रचना होताच आर. आर. पाटील यांच्याकडे या तालुक्याचे प्रतिनिधित्व आले होते. त्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न खासदारांनी तासगावचा स्वतंत्र मतदारसंघ असल्यापासून सुरू होते. आबांच्या बालेकिल्ल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी दिग्गज मंडळींनी मदतीचा हात दिला. मात्र खासदारांना शक्य झाले नाही. २०१४ मध्ये मात्र, संजयकाकांनी भाजपमध्ये जाऊन खासदारकी मिळवली. तत्पूर्वी राष्ट्रवादीने विधान परिषदेची संधी देऊन आबा-काका यांच्यातील राजकीय वादाला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला होता.

तासगावमधील आबा-काका वाद राजकीय व्यासपीठावर संपुष्टात आल्याचे वरकरणी दिसत असले तरी गावपातळीवर हा वाद आजही कायम आहे. नेतृत्वाच्या पातळीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरता हा वाद संपुष्टात येतो, मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी या संघर्षांला तात्पुरती वात लावून दिली जाते. पुन्हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीपुरता शीतपेटीत बंद केला जातो. याचा फटका अजितराव घोरपडे यांना विधानसभा निवडणुकीवेळी बसला होता. यामुळे सावध झालेल्या घोरपडे यांनी नगरपंचायत निवडणुकीवेळी एका आघाडीत असूनही नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये खासदार गटाला सहकार्य न करता राष्ट्रवादीला मदत केली.

या सर्व घटना पाहता आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना शह देण्याच्या खासदार पाटील यांच्या प्रयत्नांना रोखण्याची भूमिका घोरपडे यांनी घेतली. तासगावमध्ये जसा खासदारांचा स्वगट प्रबळ आहे तसा कवठेमहांकाळमध्ये होऊ नये असे प्रयत्न घोरपडे यांचे आहेत. मात्र, या निमित्ताने खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांचे राजकीय व्यासपीठावर आगमन झाले आहे. नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता बळकावल्यानंतर भाजप विजयाच्या घोषणाबाजीपेक्षा खासदार व खासदार पुत्रांच्या विजयाच्या घोषणांचा आवाज मोठा होता. विजयी मिरवणुकीमध्ये दोघे पितापुत्र न्हाऊन निघाले होते. यावरून खासदार पुत्रासाठी राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशी रास्त शंका केवळ कवठेमहांकाळलाच नव्हे तर तासगावकरांनाही पडला आहे. येत्या काही दिवसांत तासगाव नगरपालिकेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही पाठोपाठ होणार आहेत. त्या वेळी राजकीय बांधणी पक्ष म्हणून भाजपची होते की गटाची हेही लक्षात येणार आहे.