मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीत राजस्थानातून आलेले कंबलवाले बाबा हे अंगावर घोंगडे टाकून दिव्यागांना बरं करतो असा दावा करत आहेत. हा दावा करणाऱ्या या बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कारवाईची मागणी केली आहे. तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम यांनी आयोजित केलेलं शिबीर म्हणजे अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधींकडून मिळणारा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?
दिव्यांग व्यक्तींच्या अंगावर घोंगडे टाकून त्यांना बरं करण्याचा दावा राजस्थान येथील एक बाबा करीत आहे. मुंबईतील घाटकोपर भागात भाजपा आमदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती महिलांना संतापजनक पद्धतीने स्पर्श करते. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे.
काहीही झालं तरी ‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ म्हणणारे हे सरकार, महिलांचा राजरोसपणे विनयभंग होत असताना खंबीर पावले कधी उचलणार आहे? अशा व्यक्ती ज्या आमदाराचा आधार घेऊन अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात त्या आमदारावर शासन कारवाई करण्याची तसदी घेणार आहे का? अशा भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेला प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्रात थारा देता कामा नये.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
कंबलवाले बाबा नावाचा बाबा राम कदम यांच्या घाटकोपर मतदारसंघात दिव्यांग व्यक्तीवर घोंगडं टाकून त्यांना बरं करण्याचा दावा करतो. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. कंबलवाले बाबाची ही बुवाबाजी बंद केली जावी असं आवाहन अंनिसने पोलिसांना केलं आहे. आमदार राम कदम आणि पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे साक्षीदार म्हणून ते पोलिसांची मदत करू शकतील असं अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. तसंच आता सुप्रिया सुळेंनीही यावरुन कडाडून टीका केली आहे.