Supriya Sule : राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी, यासह आदी महत्वाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेतेही उपस्थित होते.
दरम्यान, या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. एका महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करते की तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना भेटा. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करा आणि सांगा की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा. आम्ही एक महिन्याचा कालावधी देऊ, जर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या सरकारला आम्ही कुठेही फिरू देणार नाही. हे मी स्पष्टपणे सांगते”, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
“सरकारने लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्याच टप्प्यांत २५ लाख महिलांची नावं कमी केली. मात्र, आता आम्ही हे सहन करणार नाही. याबाबत आपण एक मोठं आंदोलन सुरू करणार आहोत. गाव, वाडी, वस्तींवर जाऊन ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले त्यांचे पैसे पुन्हा मिळवून देऊ. त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी देखील काम करणार आहोत. सरकारने म्हटलं होतं की सरसकट कर्जमाफी करू. आम्ही देखील शब्द दिला होता तेव्हा यूपीएचं सरकार होतं, तेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान होते आणि शरद पवार कुषीमंत्री होते. तेव्हा आपण शेतकऱ्यांची ७० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र, आज काय परिस्तिती आहे? ना सरसकट कर्ज माफी होतेय, ना कोणाला पैसे मिळतायेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
‘…तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही’ : शरद पवार
“आज नाशिकचा कांदा जगात जातो. शेतकऱ्यांना आशा असते की कांदा विकल्यानंतर दोन पैसे मिळतील. मात्र, आज कांद्याला दर नाही. कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. मात्र, केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? यावर उत्तर शोधायचं असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं तुम्ही देशाला दाखवलं. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. असं चित्र असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. ही सुरूवात येथेच थांबणार नाही. देवाभाऊंना माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पाहा. काय घडतंय? नेपाळमध्ये काय घडतंय ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आली आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली”, अशी टीका शरद पवार यांनी सरकारवर केली.