एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने मृत्यूला कवटाळलं. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भडकलेल्या मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी राजकारण्यांवर टीकास्त्र डागलं. “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीये… दिल्लीत हेच चाललंय, महाराष्ट्रात हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा थेट सवाल तरडे यांनी राजकारण्यांना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्निलच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना प्रविण तरडे यांनी साम या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यवस्था आणि राजकारण्यांबद्दलचा संताप व्यक्त केला. “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीये… दिल्लीत हेच चाललंय, महाराष्ट्रात हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा रोखठोक सवाल तरडे यांनी केला.

हेही वाचा- स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

“फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय… मग असेच तरुण मरणार! एपीएससी-युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काल एक कलादिग्दर्शक मेला. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार. त्यांच्याबद्दल काही बोलायला जावं तर ट्रोल करतात. ट्रोल करणाऱ्यांना हे माहिती नाहीये की, एक दिवस आपल्याच घरातील कुणीतरी मरणार आहे. या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी) लोक जिवंत राहणार आहेत,” अशी खंत प्रविण तरडे यांनी व्यक्त केली.

यावेळी तरडे यांनी तरुणांनाही आत्महत्येच्या विचारांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “अभ्यास करून आणि आईबापांची स्वप्न पाहून तुम्ही इथपर्यंत आला आहात. कुठल्यातरी फालतू सिस्टिमसाठी स्वतःचा अमूल्य जीव वाया घालवू नका. संयम ठेवा आणि प्रशासकीय सेवेत जाऊन यांना उघडं पाडा,” असं ते म्हणाले.

हेही वाचा- Swapnil Lonkar Suicide : “मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचं काय?”

“आत्महत्या करून नका. तुम्ही आत्महत्या केल्यानं या गेंड्याची कातडी असणाऱ्या लोकांना काहीच फरक पडणार नाही. फरक पडेल, तो तुमच्या आईबापाला. तुमचीच आई रडतेय. ज्यांच्या सिस्टिमला तुम्ही कंटाळून आत्महत्या केली; ते नवीन राजकारण, नवीन मित्र करण्यात गुंतले आहेत. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून त्यांचं भविष्य सेटल करण्यात गुंतले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकारणात आणून मोठं करण्यात गुंतले आहेत. पुण्यात ज्या पक्षाने गर्दी केली, त्याच्यावर टीका करणारे आज त्यांच्याच मांडीला-मांडी लावून बसलेत. यांना लाज कशी वाटत नाही. तरुण मरतोय आणि हे मजा करत आहेत. त्यामुळे आपल्या आईबापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. गोठ्यात बांधलेल्या गुरांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या गुरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं असेल, पण या माणसांच्या डोळ्यात येणार नाही,” असा संताप प्रविण तरडे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc swapnil lonkar suicide swapnil lonkar suicide case pravin tarde reaction bmh
First published on: 04-07-2021 at 18:15 IST