scorecardresearch

एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा ; वर्षभरात तीन हजार नवीन गाडय़ा

उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने येत्या वर्षभरात तीन हजार नव्या बसगाडय़ा भाडेतत्त्वावर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विजेवरील बसबरोबरच सीएनजी, एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) गाडय़ांचा समावेश असेल, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरू होण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नव्या बसगाडय़ा घेण्यावरही चर्चा झाली. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक बोजा पडत असलेल्या एसटी महामंडळाने यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गेल्या तीन ते चार वर्षांत नव्या बसगाडय़ांची खरेदीही झाली नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर बस घेण्यात येणार आहेत. या बसगाडय़ांमध्ये एक हजार बस या विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस आहेत. तर उर्वरित बस या सीएनजी, एलएनजी असतील. डिझेलवरील काही साध्या बसही एलएनजीमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. यामुळे महामंडळाचे वर्षांकाठी काही कोटी रुपयांची बचत होणार आहे. करोना आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न होणार असून त्यावरही बैठकीत चर्चा झाली.

सदावर्तेकडून अवैध पैसे गोळा

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केल्याचा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे. पैसे नेमके कुठल्या कामासाठी वापरले गेले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सदावर्ते हेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी जबाबदारही असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांच्या घरावर हल्ल्यात ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msrtc decided to take 3000 new buses on lease zws

ताज्या बातम्या