पगारवाढीविषयी सरकारकडून अद्यापही सकारात्मक निर्णय न आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ(एसी) कर्मचारी संपावर गेले असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. काँग्रेस प्रणित इंटक संघटनेकडून हा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद, बीडमध्ये संपाला चांगला पाठिंबा मिळत आहे. तर, औरंगाबादमध्येही संप यशस्वी होताना दिसत आहे. एसटी रस्त्यावर येऊ नयेत यासाठी औरंगाबादमध्ये काही ठिकाणी एस.टी.बसचे टायर पंक्चर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
बीडमध्ये एकही एसटी जिल्ह्याबाहेर गेलेली नाही. अहमदनगरमध्ये १४ डेपोतील बसेस स्थानकातच उभ्या आहेत. धुळे, कल्याणमध्येही संपाला चांगला पाठिंबा मिळत आहे. २०१२-१६ वर्षांसाठीचा कामगार करार रद्द करून या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, अशी मागणी इंटक संघटनेने केली आहे. एसटी महामंडळातील इंटक ही सर्वात मोठी कामगार संघटना असून, एसटीतील जवळपास ७५ हजार कामगारांचे इंटक प्रतिनिधीत्व करते.
दरम्यान, संपावरून एसटी संघटनांमध्ये वाद आहेत. काँग्रेस प्रणित इंटक संघटनेकडून हा संप पुकारण्यात आला आहे. इतर संघटनांचा संपाला पाठिंबा नाही. त्यामुळे उर्वरित संघटना कोणती भूमिका घेतात आणि दिवसभरात या संपाच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.