मुंबई: कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील बहुतांश भागात एसटी सेवा ठप्पच आहे. एसटीचे राज्यातील ६४ हजाराहून अधिक चालक आणि वाहक अद्यापही संपातच आहे. पुन्हा कर्तव्यावर येण्याचे प्रमाण कमीच असल्याने एसटी महामंडळाने प्रतिक्षा यादीवरील दोन ते अडीच हजार चालक कम वाहकांना कामावर रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे, जळगाव यासह अन्य काही भागात ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे संप पुकारला. हा संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईबरोबरच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही नोटीस पाठवून सेवा समाप्तीच्या कारवाईचा इशारा दिला. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहनही महामंडळाने के ले. परंतु त्याला कमी प्रतिसाद मिळत आहे. एसटीतील एकूण कर्मचारी संख्या ९२ हजार २६६ आहे. १२ नोव्हेंबरला १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले होते. १८ नोव्हेंबरला हीच संख्या ७ हजार ५४१ पर्यंत पोहोचली. यामध्ये २५८ चालक आणि १५३ वाहक आणि ५,२०५ प्रशासकीय आणि १,९२५ कार्यशाळेतील कर्मचारी आहेत. अद्यापही ८४ हजार ७२५ कर्मचारी संपात सामिल आहेत. यामध्ये ३६ हजार ९६७ चालक आणि २७ हजार ९०२ वाहक असे ६४ हजार ८६९ जण आहेत. ऊर्वरित कर्मचारी हे प्रशासकीय व कार्यशाळेतील आहेत.

सेवा पूर्ववत करण्यासाठी चालक, वाहकांबरोबरच तांत्रिक कर्मचारी कामावर रुजू होणे आवश्यक आहे. परंतु चालक आणि वाहक परतण्याचे प्रमाण फारच कमी असून एसटी सेवा सुरळीत होत नसल्याने महामंडळाने २०१६..१७ आणि २०१९ मधील भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालक.. वाहकांना रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण दोन ते अडीच हजार चालक.. वाहक असून करोनाकाळात त्यांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया थांबली होती. प्रवासी संख्या घटल्यामुळे कमी गाडय़ा सोडण्यात येत होत्या. 

संपाबाबत परब – फडणवीस चर्चा

परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एसटी संपाबाबत आणि त्यावरील संभाव्य तोडग्याबाबत चर्चा केली. फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री या नात्याने राज्यातील सर्व विभागांची माहिती आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली व ती सकारात्मक झाली. फडणवीस यांनी काही सूचना केल्या असून त्यावर राज्य सरकार विचारविनिमय करून पुढील निर्णय घेईल, असे अनिल परब यांनी सांगितले.  कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना धमक्या देण्यात येत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, अशी मागणी  फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.