महाराष्ट्रात सर्वात चर्चेत राहिलेली आणि टीका झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना अनेकदा पाहण्यास मिळाला. या योजनेत अनेक पुरुषांनी लाभ घेतला अशाही बातम्या समोर आल्या. ज्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला होता. तर विरोधकांनी ही योजना लवकरच बंद केली जाईल असं सांगितलं होतं. दरम्यान ही योजना अद्याप बंद झालेली नाही. या योजनेत पात्र महिलांचे निकष आणखी कठोर करण्यात आले आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्याचे पैसे मंगळवारपासून वितरीत होण्यास सुरुवात होईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजनेला सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ५०० रुपये दिले जातात. मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेवर ही योजना आधारलेली आहे. ही योजना सुरु झाल्यापासूनच या योजनेवर विरोधक टीका करत होते. मात्र ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्याचे पैसे उद्यापासून खात्यात जमा होतील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांची पोस्ट काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबरच्या आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !
अशी पोस्ट महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलं आहे.
